राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय कोल्हापूर अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर नुकतेच शिंगणापूर या गावी घेण्यात आले.
*युथ फॉर माय भारत* हे यावर्षीच्या शिबिराचे घोषवाक्य होते. या घोषवाक्यास अनुसरून युवक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने शिबिरामध्ये विविध बाबींचा समावेश करण्यात आला होता. यामध्ये विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्व विकास, व्यवसाय संधी, नेतृत्व कौशल्य या विषयावरील व्याख्यानमालांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच ग्रामस्थ आणि शेतकरी बांधव यांच्यासाठी शेती विषयक व्याख्यानमालांचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करता प्रा. अविनाश भाले, संचालक, यूजीसी सेंटर, शिवाजी विद्यापीठ यांनी श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून समाजमन समजून घेणे आणि एकमेकांसोबत काम करून मैत्री भावना वृद्धिंगत करून समाजसेवेचा वसा अनेकांपर्यंत पोहचविण्यासाठी तसेच समाजात आदर्श व्यक्ती म्हणून नावलौकिक मिळविण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन शिबिरार्थी विद्यार्थ्यांना केले. शिबिराच्या उद्घाटन आणि समारोप कार्यक्रमा दरम्यान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता, डॉ.सतीश बुलबुले, यांनी विद्यार्थ्यांना श्रमसंस्कार शिबिरा मध्ये घेतलेल्या शिक्षणाचा आपल्या दैनंदिन जीवनात समावेश करून सामाजिक योगदान देण्यासाठी प्रयत्नशील राहावे यासाठी आवाहन केले. शेतीविषयक व्याख्यानांमध्ये प्रामुख्याने, तीनही हंगामामध्ये घेता येऊ शकणाऱ्या मका या पिकाबद्दल शास्त्रोक्त लागवड या विषयावर डॉ. सुनील कराड, मका पैदासकार, यांनी सखोल मार्गदर्शन केले.
तसेच उसाच्या हुमणी किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या उपाययोजना आणि माहिती प्रात्यक्षिकाद्वारे डॉ. अभयकुमार बागडे, प्राध्यापक, कीटकशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय, कोल्हापूर यांनी सांगितली. PM किसान योजना, त्यातील अटी नियम, आणि इतर पूर्तता या बाबींवर श्री. संतोष पाटील आणि रामेश्वरी कांबळे यांनी मार्गदर्शन केले.
महिला शेतकऱ्यांना शेती सोबतच व्यवसायाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी कृषी महाविद्यालयातील, प्रा. सीमा सरवदे, उद्यानविद्या विभाग आणि डॉ. ज्ञानेश्वर पतंगे, दुग्धशास्त्र विभाग यांनी फळ प्रक्रिया आणि दुग्धजन्य पदार्थ याचे प्रात्यक्षिकाद्वारे प्रशिक्षण दिले. यामध्ये फळांपासून जॅम, जेली व सरबत तयार करणे, तसेच दुधापासून पनीर, बासुंदी, खवा इत्यादी पदार्थ तंत्रशुद्ध पद्धतीने बनवून लघुउद्योग सुरू करता येऊ शकतो यासाठी महिला वर्गास प्रेरित केले. या प्रशिक्षणास महिला शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद लाभला. तसेच शिबिरादरम्यान अनेक सामाजिक विषयांवर जनजागृती करण्याचे उद्देशाने विद्यार्थ्यांनी विविध पथनाट्य, प्रभातफेरी यांचे नियोजन केले होते. तसेच गावातील महिला आणि मुलींना मासिक पाळी गैरसमज निराकरण या विषयावर प्रबोधन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवर 18 अवॉर्ड्स मिळालेला ‘मंडळ आभारी आहे’ हा चित्रपट दाखविण्यात आला.
विद्यार्थ्यांना आपले उज्वल भविष्य निर्माण करण्यासाठी निरोगी जीवनशैली आणि वेळेचे व्यवस्थापन या विषयावर वेलनेस कोच श्री दिनेश माळी यांनी मार्गदर्शन केले. तसेच शिवव्याख्याते श्री उदय मोरे यांनी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार मुलांमध्ये रुजवण्याच्या दृष्टीने उदबोधित केले. तरुणांमध्ये वाढत असलेल्या व्यसनाधीनता आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवरती मार्गदर्शन करण्यासाठी श्री. मकरंद लोहार यांनी व्यसनमुक्ती आणि मधुमेहमुक्ती याबाबत प्रबोधन केले. शिबिरादरम्यान विद्यार्थ्यांनी गावातील मातोश्री वृद्धाश्रमास भेट देऊन येथील वृद्धांसोबत आनंददायी वेळ घालविला.
मनोरंजनाच्या कार्यक्रमांमध्ये महिलांसाठीच्या पैठणी खेळात गावातील महिलांनी भाग घेऊन खेळाचा आनंद लुटला.
शिंगणापूर गावच्या सरपंच सौ. रसिका पाटील यांनी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी गावामध्ये केलेल्या श्रमदानाचे कौतुक केले.
दरम्यान शिबिरात विद्यार्थ्यांना वास्तव्यास कोणतीही अडचण येऊ नये यासाठी गावातील सामाजिक कार्यकर्ते श्री अमर पाटील, कॅप्टन उत्तम पाटील, श्री.प्रकाश निंबाळकर, अर्जुन म्हसकर, श्री महेश पाटील आदींनी मोलाचे सहकार्य केले. शिबिराच्या शिस्तबद्ध नियोजनासाठी डॉक्टर शैलेश कांबळे, उपाध्यक्ष विद्यार्थी परिषद आणि इंजि. अजय देशपांडे, विद्यार्थी कल्याण अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली शिबिराचे यशस्वी आयोजन डॉ. मनिषा मोटे आणि डॉ. मोहनराव जाधव, कार्यक्रम अधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना, यांनी केले.
शिबिरातील विविध कार्यक्रमांसाठी आर्या पवार, रुपेश पवार, कार्तिक सोनूने, क्रांतिसिंह खरात, वसुंधरा, वाडकर, दिव्या कांबळे, धनश्री माने महेक मुजावर, निखिल काटकर, धनंजय निंबाळे आदी स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.